‘बारकोड’ म्हणजे काय | WHAT IS BARCODE IN MARATHI

‘बारकोड’ म्हणजे काय | WHAT IS BAR CODE IN MARATHI

‘बारकोड’ म्हणजे काय | WHAT IS BAR CODE IN MARATHI – अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये एका दिवसात लक्षावधी डॉलर्सची उलाढाल होते.

अक्षरशः सहस्त्रावधी नागरिक अशा बाजारात हजारो प्रकारच्या वस्तू खरेदी करीत असतात. त्या प्रत्येक पदार्थाची किंमत काउंटरवरील सेल्समनला माहिती असण्याची शक्यता कमीच!

कारण सेल्समनही सारखे बदलत असतात. समजा प्रत्येक वस्तूची किंमत त्याच्या वेष्टनावर लिहिली तरी ती वाचून सर्व वस्तूंच्या किंमतीची बेरीज होईपर्यंत वेळ जाणार !

सध्याच्या धावपळीच्या युगात कुणालाही उगीचच वेळ वाया गेलेला खपत नाही. त्यातूनच मग चिडाचीड आणि हमरीतुमरी असेही प्रकार पहायला मिळतात.

या सगळ्या कटकटीतून सुटका करण्यासाठी पाश्चात्य देशात एक उत्तम तोडगा काढण्यात आला आहे. त्याचं नाव आहे ‘बारकोड’ त्याला ‘युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड’ असंही म्हणतात.

कोड म्हणजे सांकेतिक शब्द ! ‘बार-कोड’ म्हणजे पट्टयांच्या स्वरूपातील सांकेतिक शब्द ! अमेरिकेतील प्रत्येक वस्तूच्या वेष्टनावर विशिष्ट जागी निरनिराळ्या जाडीचे अनेक उभे पट्टे तुम्हाला आढळतील.

त्यातील काही चांगले ठळक तर काही केवळ उभ्या रेषा असतात. त्यांचं परस्परांमधील अंतरही सारखं नसतं. या आकृतीलाच ‘बार-कोड’ असं नाव आहे. पेपरबॅक एडिशनच्या पुस्तकांवरही हे बार-कोड तुम्हाला आढळेल.

बार-कोड मध्ये त्या वस्तूची माहिती सांकेतिक भाषेत लिहिलेली असते. ‘स्कॅनर’ नावाच्या एका यंत्राने ती वाचता येते.

बारकोडचा वापर

वस्तूवरील बारकोड स्कॅनर समोर धरलं की विशिष्ट प्रकारचे सिग्नल्स निर्माण होतात, ते सरळ संगणकाकडे जातात. त्या सिग्नलवरून संगणकाच्या मेमरीमध्ये संग्रहित केलेली त्या वस्तूची माहिती संगणकाला समजते.

त्या माहितीपैकी संगणक त्या विशिष्ट वस्तूची किंमत चटकन् कॅशरजिस्टरकडे पाठवून देतो.

ज्या ज्या वस्तूवरील बारकोड स्कॅनर समोर धरलं जाईल त्या त्या वस्तूंच्या किमतीची बेरीज कॅशरजिस्टरवर आपोआप करण्यात येईल, आणि काही सेकंदात सर्व वस्तूंची एकत्र किंमत कॅशरजिस्टरवर दिसू लागेल.

वाचनालयातील पुस्तकांच्या देवघेवीसाठी बार कोडचा फारच चांगला उपयोग करता येतो. प्रत्येक पुस्तकाचं बार-कोड स्वतंत्र असतं.

बार-कोडच्या साह्याने वाचनालयातून पुस्तक बाहेर जाताना व परत आल्यावर त्या आपोआप संगणकात नोंद करता येते. एखादे पुस्तक परत यायला उशीर झाला तर संगणक ताबडतोब त्याची सूचना देतो.

वाचनालयातील सर्व पुस्तकांची नोंद बार-कोड मार्फत आपोआप होऊन जाते.

बारकोडचे कार्य

बार-कोडमध्ये प्रत्येक आकड्यासाठी दोन काळे व दोन पांढरे पट्टे असतात. त्यांची जाडी कमी जास्त असली, तरी त्या सर्व पट्ट्यांची एकूण रूंदी मात्र प्रत्येक आकड्यासाठी सारखीच असते.

एकूण बार-कोड दोन भागात विभागलेलं असतं. त्यातील डाव्या बाजूच्या आकड्यांसाठी पट्टयांची संख्या विषम असते आणि त्यांची सुरूवात पांढऱ्या पट्टयाने होते.

उजव्या भागातील आकड्यांसाठी काळ्या पट्ट्यांची संख्या सम असते आणि त्यांची सुरूवातही काळ्या पट्ट्याने होते. बार-कोडचे दोन भाग काळ्या पट्टयांनी अलग केलेले असतात.

तसेच त्यांच्या सुरूवातीला आणि शेवटी आणखी दोन काळे पट्टे असतात. त्यांना गार्डस् असं नाव आहे. डावीकडील भागात निर्मात्याचे नाव तर उजव्या भागात वस्तूचा क्रमाक लिहिलेला असतो.

हे सुद्धा वाचा