बेसिक प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय | BASIC PROGRAMMING LANGUAGE IN MARATHI

बेसिक प्रोग्रॅमिंग लँग्वेज

बेसिक प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय | BASIC PROGRAMMING LANGUAGE IN MARATHI – ‘बिगिनर्स ऑल परपज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड’ या लांबलचक इंग्रजी शब्दांची पहिली अक्षरे घेऊन बेसिक हा शब्द तयार केला आहे.

सर्व भाषांमध्ये अतिशय सोपी आणि म्हणूनच सर्वात लोकप्रिय अशी ही संगणकाची भाषा आहे. संगणकाचे ज्याला यत्किंचीतही ज्ञान नाही, असा माणूसही अगदी सहजगत्या ही भाषा लवकर आत्मसात करू शकतो.

या भाषेत लिहिलेल्या प्रोग्रॅममध्ये सुधारणा करणे किंवा त्यात भर घालणे, ह्या क्रिया अगदी सुलभरीत्या करता येतात. बेसिकमुळे आपण संगणकाशी सरळ संपर्क प्रस्थापित करू शकतो.

त्यावर आपल्या प्रोग्रॅमची सहजपणे अंमलबजावणी करता येते, आणि त्याचे निष्कर्षही ताबडतोब पहाता येतात. या भाषेचे नियम अगदी साधे आहेत, हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

बिगिनर्स ऑल परपज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड – बेसिक | BASIC (BEGINNERS ALL-PURPOSE SYMBOLIC INSTRUCTION CODE)

बेसिक भाषेच्या साधेपणामुळेच तिला संगणकाच्या निर्मात्यांचाही चांगलाच पाठिंबा मिळाला.

अजूनपर्यंत सर्व उच्च दर्जाच्या भाषांमध्ये बेसिक इतकी लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याही भाषेला मिळाली नाही.

बेसिक भाषेचे मशीन लँग्वेजमध्ये भाषांतर करणारा दुभाषा संगणकात समाविष्ट केलेला असतो; किंवा डॉसमध्येच संग्रहित केलेला असतो. त्यामुळे बेसिक भाषेसाठी वेगळा दुभाषा किंवा कंपायलर लागत नाही.

शैक्षणिक प्रोग्रॅम किंवा संगणकावरील खेळ बहुधा बेसिक याच भाषेत लिहिले जातात, आणि ते वारंवार अनेक मासिकातून प्रसिद्ध होतात.

बेसिक प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा शोध

१९६३-६४ या सालात डार्टमाउथ कॉलेजमध्ये जॉन केमेनी आणि थॉमस कुर्टझ् यांनी बेसिक भाषेचा पाया घातला.

सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना शिकण्यास सोपी जावी आणि व्यवहारात त्यांनी तिचा उपयोग करावा या उद्देशाने त्यांनी ही भाषा तयार केली.

डार्टमाउथ कॉलेजमध्ये हे दोन्ही उद्देश कमालीचे सफल झाले. आणि ताबडतोब जनरल इलेक्ट्रिक, हेवलेट पॅकार्ड वगैरे बड्या संगणक निर्मात्यांचे या भाषेकडे लक्ष गेले.

या भाषेचे अनेक फायदे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या संगणकामध्ये बेसिक भाषा समाविष्ट करून टाकली. १९७४ पर्यंत जवळ जवळ सर्व संगणक निर्मात्यांचा तिला आश्रय मिळाला.

अर्थातच त्यांनी आपल्याला सोईप्रमाणे तिचा चेहरा मोहरा थोडा थोडा बदलला. मराठी भाषेचेच कोकणी, मालवणी, वऱ्हाडी, खानदेशी, पुणेरी वगैरी प्रकार असतात ना !

तसेच बेसिक भाषेचेही वेगवेगळे प्रकार निर्माण झाले.

बेसिक प्रोग्रॅमिंग लँग्वेजची वैशिष्ट्ये

सरते शेवटी १९७८ साली अमेरिकन नॅशनल स्टैंडर्ड इन्स्टिट्यूट या संस्थेने या बजबजपुरीतून मार्ग काढण्यासाठी बेसिक भाषेची प्रमाणबद्ध संहिता तयार केली, आणि तीच सध्या प्रचलित आहे.

शाळेतील मुलापासून गुंतागुंतीची गणिते करणाऱ्या इंजिनिअर आणि करोडो रूपयांची उलाढाल करणाऱ्या उद्योगधंद्यांच्या संचालकापर्यंत सर्वजण बेसिक ही भाषा वापरू शकतात, हेच या भाषेचे खास वैशिष्ट्य आहे.

हे सुद्धा वाचा