कोबोल प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय | COBOL PROGRAMMING LANGUAGE IN MARATHI

कोबोल प्रोग्रॅमिंग लँग्वेज

कोबोल प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय | COBOL PROGRAMMING LANGUAGE IN MARATHI – १९५९ सालच्या मे महिन्यात अमेरिकेच्या संरक्षण खात्याने एक वैशिष्ट्यपूर्ण परिषद आयोजित केली होती.

वॉशिंग्टन येथील पेंटॅगॉनच्या सुप्रसिद्ध पंचकोनी इमारतीत ही परिषद संपन्न झाली.

परिषदेचा उद्देश होता, उद्योगधंद्यांना उपयोगी पडेल, अशी संगणकाची एक खास भाषा तयार करणे.

या परिषदेसाठी संगणकाचे उत्पादक, सरकारी अधिकारी, विद्यापीठांमधील प्राध्यापक, संगणकाचा वापर करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी आणि अर्थातच सैन्यामधील काही तज्ञ उपस्थित होते.

त्या ठिकाणी जमलेल्या प्रतिनिधीमधून एक लहान समिती या विषयाचा अभ्यास करण्यासाठी निवडण्यात आली. त्या समितीने अगदी अल्पकाळात खास उद्योगधंद्यांसाठी उपयोगी पडेल अशी भाषा निर्माण केली, तीच कोबोल !

१९६० साली सर्वसामान्य व्यवहारासाठी कोबोल भाषेचे नियम प्रसिद्ध झाले.

कोबोल प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा फुल फॉर्म

‘कॉमन बिझिनेस् ओरिअेंटेड लँग्वेज’ या शब्दांचे लघुरूप आहे कोबोल ! १९६१ साली कोबोलचे कंपायलर्स बाजारात उपलब्ध झाले. त्या नंतर अमरिकन नॅशनल स्टैंडर्ड इंस्टिट्यूट या संथेने प्रथम १९६८ साली, नंतर १९७४ साली, आणि अगदी अलिकडे म्हणजे १९८० साली कोबोल भाषा प्रमाणित केली.

कोबोल लँग्वेजचे विभाग

एखादा इंग्रजी भाषेतील लांबलचक निबंध असावा ना ! तसंच काहीसं कोबोलचं स्वरूप असतं. त्यामध्ये आयडेंटिफिकेशन, एन्व्हिरॉन्मेंट, डाटा आणि प्रोसिजर असे चार प्रमुख विभाग असतात, आणि ते त्याच क्रमाने लिहावे लागतात.

आयडेंडिफिकेशन विभागात कोबोल प्रोग्रॅमचे नाव, लिहिणाऱ्याचे नाव वगैरे गोष्टी असतात. एन्व्हिरॉन्मेंट विभागात कोणते संगणक वापरले त्यांचा उल्लेख करण्यात येतो.

डाटा विभागात इनपुट आणि आउट्पट या संबंधीची माहिती असते आणि प्रोसिजर विभागात गणित करण्यात येते. परंतु त्यामध्ये गुंतागुंतीची सूत्रे सोडविली जात नाहीत.

डिव्हिजन नंतर सेक्शन, त्यानंतर पॅराग्राफ, सेन्टेन्स, शब्द, अशी इंग्रजी भाषेप्रमाणेच कोबोलची उतरण आहे.

कोबोल प्रोग्रॅमिंग लँग्वेज ची वैशिष्ट्ये

प्रोग्रॅम फाइल्स हाताळण्याची सुलभ व्यवस्था, मजकूर लिहिण्याची उत्तम सोय, अवाढव्य डाटा संग्रहित करून त्यावर सहजपणे प्रक्रिया करण्याची पद्धत, साध्या सोप्या गणिती सूत्रांचा उपयोग, ही आहेत कोबोलची खास वैशिष्ट्ये.

परंतु कोबोलचा कंपायलर संगणकातील फार मोठी मेमरी अडवून तर टाकतोच, पण खुद्द कोबोल प्रोग्रॅमसाठीही पुष्कळ मेमरीची आवश्यकता असते.

फोट्रॉन भाषेत जो प्रोग्रॅम १० ते १५ ओळीत लिहिता येतो, त्यासाठी कोबोल भाषेत ७५ ते १०० ओळी खर्च कराव्या लागतात.

एक साधा कोबोल प्रोग्रॅम कित्येक पानांचा असून शकतो. उद्योगधंद्यांमध्ये कोबोल हीच भाषा कित्येक वर्षे लोकप्रिय होती, अजूनही आहे. पण डीबेस, लोटस अशा नवीन आणि सोप्या भाषा त्याच कामासाठी आता निर्माण झाल्या आहेत.

त्यामुळे नजिकच्या काळात कोबोलच्या लोकप्रियतेला हळूहळू ओहोटी लागेल.

हे सुद्धा वाचा