संगणकाच्या पिढ्यांची माहिती | COMPUTER GENERATIONS IN MARATHI

संदर्भ

संगणकाच्या पिढ्यांची माहिती | COMPUTER GENERATIONS IN MARATHI – संगणकाच्या पिढ्या या शद्वानं खरं म्हणजे आपण जरा चक्रावून जातो. मानवाच्या पिढ्या हा शब्द आपल्याला समजू शकतो. पिता, मुलगा, नातू, पणतू अशी मानवाच्या पिढ्यांची उतरंड लावता येते.

त्यामध्ये पित्यापासून मुलाचा, त्याच्या पासून नातवाचा, अशी जन्मांची मालिका असते. संगणकाचा काही तसा प्रकार नाही. अजूनही एका संगणकापासून दुसऱ्याचा जन्म होत नाही.

भविष्यात कधी तसं होईल असं वाटत नाही. संगणकाच्या पिढ्या हा एक वाक्प्रचार आहे. संगणकाचं स्वरुप जसं जसं बदलत गेलं, तसं तसं त्यांना पहिली पिढी, दुसरी पिढी अशी नावं मिळत गेली.

मुख्यतः संगणकामधील विद्युतमंडले बनविण्याचा मुख्य घटक कोणता यावरून त्यांची पिढी ठरविली जाते. सध्या आपण चौथ्या पिढीच्या संगणकाच्या काळात वावरत आहोत, आणि पाचवी पिढी येऊ घातली आहे.

संगणकाच्या पहिल्या चार पिढ्या कोणत्या होत्या ते थोडक्यात पहा !

पहिली पिढी (१९५१ ते १९५८)

‘युनिव्हॅक १’ या संगणकाच्या निर्मितीबरोबरच जून १९५१ साली संगणकाची पहिली पिढी जन्माला आली. व्यापार व उद्योगधंद्यासाठी संगणकाचा वापर करण्यास त्याच वेळी सुरूवात झाली.

१९५२ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल, ‘युनिव्हॅक एक ने मतदान संपल्यानंतर, केवळ ४५ मिनिटात जाहीर केला. याच निवडणुकीत आयझेन हॉवर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली.

पहिल्या पिढीच्या संगणकात मुख्यतः निर्वात नलिका वापरल्या जात, त्यामुळे पुष्कळ प्रश्न निर्माण झाले. निर्वात नलिकांमुळे आतोनात उष्णता निर्माण होईल, आणि ती कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एअर कंडिशनची साधने वापरावी लागत.

नलिकांचा आकार मोठा असल्यामुळे पर्यायाने संगणकाचा आकारही प्रचंड होई. बरं ! नलिका केव्हा निकामी होईल त्याचाही भरवसा नसायचा, त्यामुळे तंत्रज्ञांची एक तुकडी संगणकाची देखभाल करण्यासाठी नियुक्त करणं भाग पडे.

गती आणि किंमत या बद्दल तर बोलायलाच नको ! गणना गती कमी, आणि किंमत आकाशाला भिडणारी ! अशी पहिल्या पिढीच्या संगणकांची अवस्था होती.

पगारपत्रके, जमाखर्च वैगरे माफक कामांसाठीच त्यांचा उपयोग व्हायचा.

दुसरी पिढी (१९५९-१९६४)

१९५८ च्या आगेमागे ट्रान्झिस्टरचा शोध लागला. जे काम निर्वात नलिका करायची, तेच काम ट्रान्झिस्टरच्या साह्याने करणे शक्य झालं.

त्यातूनच संगणकाच्या दुसऱ्या पिढीचा जन्म झाला. त्यामध्ये निर्वात नलिकेऐवजी, विद्युत्मंडले बनविण्याचा ट्रान्झिस्टर हा प्रमुख घटक होता.

निर्वात नलिकेपेक्षा ट्रन्झिस्टर आकाराने अगदी लहान असतो. अर्थातच संगणकाचा आकारही कमी झाला. ट्रान्झिस्टरचा आकार लहान, गती जास्त, आणि लागणारी विद्युमशक्ति कमी.

त्यामुळे संगणकातही आमूलाग्र बदल झाला. त्यांची किंमत झपाट्याने उतरली. याच काळात चुंबकीय टेप, तबकड्या तयार होऊ लागल्या त्यामुळे पुष्कळ माहिती संग्रहित करण्याची सोय झाली.

उच्च पातळीच्या भाषाही निर्माण व्हायला सुरूवात झाली. या सर्व गोष्टींचा फायदा दुसऱ्या पिढीतील संगणकांना मिळाला.

तिसरी पिढी (१९६५-१९७०)

तिसऱ्या पिढीच्या संगणकांचा मुख्य आधार होता आय्सी किंवा इंटिग्रेटेड सर्किट ! सिलिकॉन या अर्धवाहकाच्या अगदी लहान तुकड्यावर हजारों लहान लहान विद्युत् मंडले कोरण्याचे तंत्र, या काळात पूर्णत्वास पोहोचलं.

अशा एका लहानशा आयुसी मध्ये कित्येक ट्रान्झिस्टर, रेझिस्टर आणि कपॅसिटर्स कोरलेले असत. त्यामुळेच संगणकाचा आकार आणि किंमत यात विलक्षण घट झाली.

त्याची गतीही कित्येक पटीने वाढली. लहान उद्योगांच्या आवाक्यात संगणकाची किंमत येऊन पोहोचली.

चौथी पिढी (१९७१ ते आजतागायत)

चौथ्या पिढीच्या विद्युत्मंडलांचा आधार आयसी हाच आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या निर्मितीमध्ये आमूलाग्र सुधारणा झाली. तिचा आकार आणखी आकुंचित झाला.

त्याचवेळी लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किटचे तंत्र सिद्ध झाले. मायक्रोप्रोसेसर हा अशा आय्सीचा प्रकार म्हणजे एक लहानसा स्वतंत्र संगणकच असतो. अत्याधुनिक संगणकाचा मेंदू म्हणजे ही मायक्रोप्रोसेसर चिप् !

अॅप्पल, कमाडोर, बीबीसी वगैरे संगणकात 6502, लहान मुलांच्या आवडत्या स्पेक्ट्रममध्ये Z80, आणि आयबीएम् संगणकात 8088, अशा प्रकारच्या मायक्रोप्रोसेसर चिप्स वापरल्या जातात.

चौथ्या पिढीतील संगणकाचा अंतिम टप्पा म्हणजे व्यक्तिगत संगणक ! निदान पाश्चात्य देशात तो आता घराघरात दिसून येईल.

आता घरातील छोट्या टेबलावर चौथ्या पिढीचा संगणक स्थानापन्न झालेला आहे.

हे सुद्धा वाचा –