डेटाबेस / डाटाबेस म्हणजे काय | WHAT IS DATABASE IN MARATHI

डेटाबेस / डाटाबेस म्हणजे काय | WHAT IS DATABASE IN MARATHI

डेटाबेस / डाटाबेस म्हणजे काय | WHAT IS DATABASE IN MARATHI – “डेटाबेस” म्हणजे अतिशय सुसंगतपणे संग्रहित केलेली माहिती ! एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये हिंदुस्थानातल्या हजारो गिऱ्हाइकांची माहिती जमा केलेली असते.

त्यामध्ये नाव, पत्ता, शहर, राज्य, झिप्कोड, दूरध्वनी क्रमांक, अशा प्रकाराने माहिती लिहिलेली अनेक कार्डस् असतात. ती व्यक्तींच्या आद्याक्षरांप्रमाणे लावून निरनिराळ्या कप्यात व्यवस्थित ठेवून देण्यात येतात, ही सुसंगत यादी हे डाटाबेसचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

समजा या डाटाबेसमधील एन् या आद्याक्षराने सुरू होणारे विशिष्ट नाव आपल्याला पाहिजे असेल, तर आपण ‘एन्’ या आद्याक्षराने सुरू होणारी नावे असलेला कप्पा उघडू आणि त्यामधील काडाँची चळत पहायला सुरूवात करू, यालाच डाटा बेसचे मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन म्हणतात.

निरनिराळ्या कप्यांमधील माहिती सुसंगत असली तरी ती स्वतः काहीच करत नाही. तिचे व्यवस्थापन करावे लागते आणि ते संगणकाकडून अतिशय कुशलतेने करून घेता येते.

डेटाबेस रचना | DATABASE STRUCTURE IN MARATHI

आपल्याकडे उपलब्ध असलेल्या डाटा बेसची रचना विविध प्रकाराने करता येते. वरील उदाहरणात सर्व नावे आद्याक्षरांप्रमाणे लावलेली आहेत. या शिवाय ती शहरांप्रमाणे किंवा झिप्कोडप्रमाणे सुद्धा लावता येईल.

याचाच अर्थ डाटा बेसची विशिष्ट पद्धतीने रचना करता येते. याला ‘डेटाबेस रचना’ / ‘डाटाबेस स्ट्रक्चर’ असं नाव आहे.

एका प्रकारची रचना बदलून, समजा दुसऱ्या प्रकारची रचना करायची असेल तर त्यासाठी आपल्याला भरपूर वेळ खर्च करावा लागेल. संगणक मात्र हे काम अतिशय त्वरेने करून मोकळा होईल.

डेटाबेसमधील रेकॉर्ड | RECORDS IN DATABASE IN MARATHI

खरं पाहिलं तर डाटाबेस हे एक कोष्टक असतं. त्यामध्ये अनेक ओळी आणि स्तंभ असतात. प्रत्येक स्तंभाला काहीतरी मथळा असतो. त्यामुळे त्या स्तंभांत कोणती माहिती आहे ते चटकन समजते.

या स्तंभांना डाटाबेसच्या भाषेत ‘फिल्डस्’ असं नाव आहे. प्रत्यक्ष माहिती मात्र ओळीमध्ये लिहिलेली असते. त्यांना रेकॉर्डस् असं म्हणतात.

उदाहरणार्थ परीक्षेच्या निकालाचं पत्रक पहा ! त्यामध्ये नाव, परीक्षा क्रमांक, पदार्थविज्ञान, रसायन, गणित, इंग्रजी, मराठी, एकूण, वगैरे स्तंभांचे मथळे असतील. आणि प्रत्येक ओळीत त्या त्या विद्यार्थ्याचा निकाल पहायला मिळेल.

डेटाबेसची वैशिष्ट्ये | FEATURES OF DATABASE IN MARATHI

माणसाने तयार केलेला डाटाबेस आणि संगणकाचा डाटाबेस यामध्ये एक मूलभूत फरक आहे. एखाद्या ओळीकडे नुसते पाहून त्या ओळीतील निरनिराळ्या प्रकाराची माहिती माणसाला चटकन् समजू शकते.

तो व्यक्तीचे नाव आणि झिप्कोड यामध्ये गल्लत करणार नाही. पण संगणकाला हा फरक कळत नाही. त्याला व्यक्तीच नाव, तिचा पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक सर्वच सारखं.

व्यवस्थित सूचना दिल्या नाहीत, तर संगणक दूरध्वनी क्रमांकालाच व्यक्तीचं नाव असं समजेल. अर्थातच संगणकासाठी डाटाबेसची रचना करताना ती अतिशय काटेकोर पद्धतीने करावी लागते.

डाटाबेस तयार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या माहितीचे छोटे छोटे विभाग तयार करावे लागतात. याचाच अर्थ त्याची निरनिराळ्या फिल्डस्मध्ये विभागणी करावी लागते.

हेच थोडं कौशल्याचं काम आहे. वाचनालयातील पुस्तकांचा डाटाबेस तयार करण्यासाठी, पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, किंमत, प्रसिद्धी दिनांक, विषय अशा प्रकाराने फिल्डसूची रचना करता येईल.

एकदा फिल्डस् तयार झाली की उपलब्ध असलेल्या सर्व माहितीचे कोष्टक किंवा पत्रक तयार करून ते संगणकात भरता येते. हा डाटाबेस त्यानंतर फ्लॉपीवर कायमचा संग्रहित करून ठेवता येतो.

डेटाबेसवरील ऑपरेशन्स | OPERATIONS ON DATABASE IN MARATHI

डाटाबेसचं पाहिजे तसं व्यवस्थापन ही एक कलाच आहे. त्यासाठी एक वेगळीच भाषा सध्या उपलब्ध आहे. तिला ‘डाटाबेस थ्री प्लस’ असं नाव आहे. त्यामध्ये संगणकाला द्यावयाच्या अनेक सूचनांचा अंतर्भाव होतो.

डाटाबेस मॅनेजमेंटमध्ये प्रामुख्याने पुढील प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात.

  • नवीन माहितीची भर. (अॅपेन्ड / Append)
  • अनुक्रमाने माहितीची मांडणी (सॉर्ट / Sort)
  • पाहिजे त्या माहितीचा शोध. (सर्च / Search)
  • माहितीची छपाई. (प्रिंट / Print)
  • जुनी माहिती अद्ययावत् करणे. (एडिट / Edit)
  • नको असलेली माहिती पुसून टाकणे. (डिलिट / Delete)

डाटाबेस आणि त्याच्यावर आधारित ‘डाटाबेस थ्री प्लस‘ ही भाषा, म्हणजे प्रचंड माहिती सहजपणे हाताळण्यासाठी मिळालेले एक वरदान आहे, असं म्हणायला हरकत नाही.

हे सुद्धा वाचा