गिगो (GIGO) म्हणजे काय | GIGO – GARBAGE IN GARBAGE OUT IN MARATHI

गिगो (GIGO) म्हणजे काय | GIGO – GARBAGE IN GARBAGE OUT IN MARATHI

गिगो (GIGO) म्हणजे काय | GIGO – GARBAGE IN GARBAGE OUT IN MARATHI – एखादा विषय जस जसा विकसित होऊ लागतो तस तशी त्याची एक वैशिष्ट्यपूर्ण भाषा आकार घेऊ लागते, आणि मग नवनव्या शब्दांची एक टाकसाळच निर्माण होते.

संगणकाचं अगदी असंच झालं आहे. १९४५ पासून आजपर्यंत संगणक या एकाच विषयाने इंग्रजी भाषेत शतावधी शब्दांची भर घातली असेल.

विशेषतः शब्दांच्या लघुरूपांतर करण्याच्या अमेरिकन पद्धतीमुळे आणखीनच वैचित्र्यपूर्ण शब्द निर्माण होतात. गिगो हे त्याचंच एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

गार्बेज इन् गार्बेज आउट्‘ या इंग्रजी शब्दाचं ते लघुरूपांतर आहे. ‘कचरा आत (म्हणजे संगणकात) गेला की कचराच बाहेर येतो’ असा त्याचा अर्थपूर्ण अनुवाद करता येईल.

मराठीत आपण ‘जसे करावे तसे भरावे अशी म्हण वापरतो ना ! त्याच चालीवर ‘जसा प्रोग्रॅम तशी त्याची उत्तरे’ अशी संगणकासाठी आपण एक नवीन म्हण वापरू शकतो.

प्रोग्रॅम लिहिताना तर्काला फार महत्त्व असतं. त्यामध्येच घोटाळा झाला तर संगणक प्रश्नाचं उत्तर काही तरी भलतंच देऊन मोकळा होईल.

प्रोग्रॅममधील सूचनांबरहुकूम संगणक त्याची अंमल बजावणी करतो. त्यामधील तर्काच्या चुका त्याला समजत नाहीत. समजा प्रोग्रॅम बरोबर असेल; पण तो संग्रहित करीत असताना डाटा चुकीचा दिला तरीही उत्तर बरोबर मिळणार नाही, हे उघड आहे. त्यात संगणकाचा काहीही दोष नसतो.

दोष असतो तो संगणक वापरणाऱ्या व्यक्तीचा ! म्हणूनच चुकीचा प्रोग्रॅम म्हणजे कचरा संगणात गेला की चुकीची उत्तरे म्हणजेच दुसऱ्या प्रकारचा कचरा मिळेल, या अर्थाने गिगो हा चपखल शब्द आहे.

हे सुद्धा वाचा