संगणकामध्ये प्रोग्रॅम कसा लिहायचा | HOW TO WRITE COMPUTER PROGRAM IN MARATHI

संगणकामध्ये प्रोग्रॅम कसा लिहायचा | HOW TO WRITE COMPUTER PROGRAM IN MARATHI

संगणकामध्ये प्रोग्रॅम कसा लिहायचा | HOW TO WRITE COMPUTER PROGRAM IN MARATHI – संगणक शिकणाऱ्या सर्वच व्यक्तींना उत्तम प्रोग्रॅम लिहिता येईल असं नाही. प्रोग्रॅममध्ये तर्काला फार महत्त्व आहे. प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्यासाठी ज्याला योग्य प्रकाराने तर्क चालविता येतो, ती व्यक्ती उत्तम दर्जाचा प्रोग्रॅम लिहू शकते.

त्यामुळे एकच प्रकारचा प्रोग्रॅम दोन व्यक्तींनी लिहिला तर त्यामध्ये फरक आढळतो. एखादी व्यक्ती दिलेल्या प्रश्नांच उत्तर शोधण्यासाठी प्रदीर्घ मार्गाचा अवलंब करते, तर दुसरी व्यक्ती मोजक्या पदांमध्ये त्याचे उत्तर शोधून काढते.

इतर अनेक कलांप्रमाणे प्रोग्रॅम लिहिणं ही सुद्धा एक कला आहे, प्रयत्न करून ती साध्य करता येते. परंतु त्यासाठी काही निश्चित पायऱ्यांचा अवलंब करणं योग्य असते.

प्रोग्रॅम कसा लिहिण्याच्या पायऱ्या | STEPS TO WRITE PROGRAM IN MARATHI

त्या पायऱ्यांचा अनुक्रम काय आहे. पहा !

अ‍ॅनॅलिसिस / विश्लेषण | ANALYSIS IN MARATHI

पुष्कळ वेळा दिलेला प्रश्न आपल्याला समजतच नाही. अर्थातच तो सोडविण्याचे मार्ग दुरापास्त होतात. तेव्हा प्रथमतः दिलेल्या प्रश्नाचे संपूर्ण विश्लेषण करणं आवश्यक आहे.

प्रश्नामधील चल आणि स्थिर संख्या कोणत्या, उत्तरासाठी कोणती माहिती लागेल, उत्तराचे स्वरूप काय असेल आणि उत्तर मिळविण्यासाठी काय काय सूत्रे लागतील याचा अंदाज करायला हवा.

या प्रकाराला प्रश्नांचा ‘अ‍ॅनॅलिसिस’ असा शब्द आहे.

डिझाइन | DESIGN IN MARATHI

प्रश्नाचं विश्लेषण संपलं, की तो कोणत्या क्रमाने सोडवायचा याची आखणी सुरू होते. त्यासाठी आल्गोरिथम् आणि फ्लोचार्ट या साधनांचा विशेषतः उपयोग करतात.

या पद्धतीमुळे प्रोग्रॅममध्ये चुका होण्याचा संभव कमी होतो. सर्व पर्यायी मार्गांचा विचार केला आहे की नाही ते चटकन समजतं. प्रोग्रॅममध्ये किती ठिकाणी विशिष्ट गणिताची पुनरावृत्ती करावी लागेल ते ध्यानात येतं.

प्रोग्रॅमची लांबी कमीत कमी ठेवण्यासही त्यांची मदत होते. प्रोग्रॅम लिहिण्याच्या या पायरीला इंग्रजीमध्ये ‘डिझाइन’ असं नाव आहे.

प्रोग्रॅम कोडिंग | PROGRAM CODING IN MARATHI

फ्लोचार्ट तयार झाला की प्रोग्रॅम लिहिणं हे फार सोपं काम आहे. त्यासाठी फक्त आपण वापरणार ती भाषा आणि तिचे नियम माहिती असायला हवेत.

आपण लिहिलेला प्रोग्रॅम दुसऱ्याला समजेल अशा पद्धतीने तो लिहिला पाहिजे. प्रोग्रॅमचे अनेक विभाग करता येतात आणि प्रत्येक विभागात नेमकं काय केलं आहे याचा तपशील त्या विभागाच्या सुरूवातीला देता येतो.

प्रोग्रॅम लिहिण्यासाठी विशिष्ट प्रकाराने आखलेले कागद बाजारात उपलब्ध असतात त्यांना ‘कोडिंग शीटस्‘ म्हणतात. अशा कागदांवर प्रोग्रॅम लिहिला तर उत्तम !

प्रोग्रॅम लिहिण्याच्या या पायरीला ‘प्रोग्रॅम कोडिंग’ असं नाव आहे.

डीबगिंग | DEBUGGING IN MARATHI

लिहिलेला प्रोग्रॅम की-बोर्डच्या द्वारे संगणकात संग्रहित करणे ही पुढची पायरी आपण लिहिलेला प्रोग्रॅम पहिल्या फटक्यात अचूक उत्तरे देईल, असं साधारणपणे होत नाही.

जेवढा प्रोग्रॅम मोठा तेवढ्या चुका होण्याचा संभव जास्त ! या सर्व चुका शोधून त्या प्रोग्रॅममधून काढून टाकायला हव्यात. कित्येक वेळा संगणक स्वतःच अनेक चुका दाखवून देतो.

त्या तिथल्यातिथे दुरूस्त करता येतात. प्रोग्रॅममधील तर्कात काही चुका असल्या तर त्या मात्र स्वतःलाच काळजीपूर्वक पहाव्या लागतात.

प्रोग्रॅममधील चुकीसाठी इंग्रजीमध्ये ‘बग’ म्हणजेच ‘ढेकूण’ असा मजेदार शब्द आहे आणि त्या दुरूस्त करण्यासाठी अर्थातच ‘डी बग्’ असा शब्द वापरतात.

अशा प्रकारे ‘प्रोग्रॅमची टेस्टिंग’ आणि ‘डीबगिंग’ ही पायरी पूर्ण होते.

डॉक्युमेंटेशन | DOCUMENTATION IN MARATHI

इतके सर्व सोपस्कार संपले की प्रोग्रॅमची छापील प्रत, त्याची उत्तरे, प्रोग्रॅमच्या मर्यादा, विशिष्ट प्रश्न सोडविण्यासाठी त्याची अचूकता वगैरे माहिती एकत्र करून त्याचा एक अहवाल तयरा करण्यात येतो.

या अहवालालाच ‘डॉक्युमेंटेशन’ असं नाव देतात. इतकं सर्व झालं की प्रोग्रॅम सर्वांगानी परिपूर्ण होतो.

हे सुद्धा वाचा