ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय | WHAT IS OPERATING SYSTEM IN MARATHI

ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय | WHAT IS OPERATING SYSTEM IN MARATHI

ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय | WHAT IS OPERATING SYSTEM IN MARATHI – मोठ मोठ्या ऑफिसातील सर्व कामे सुरळीत आणि सुनियंत्रित चालावीत यासाठी एक व्यवस्थापक असतो, त्याला इंग्रजीत मॅनेजर असे म्हणतात.

उच्च कार्यक्षमता असलेल्या संगणकातही एकाच वेळी अनेक प्रकारची कामे चालू असतात. त्या सर्वांच्या सुयोग्य नियंत्रणासाठी एका मॅनेजरची अत्यंत आवश्यकता असते.

मात्र संगणकाचा हा मॅनेजर, अर्ज मागवून, मुलाखत घेऊन नियुक्त करावा लागत नाही.

तो एका फ्लॉपी किंवा मॅग्नॅटिक डिस्कवरच संग्रहित करून ठेवलेला असतो. या वैशिष्ट्यपूर्ण मॅनेजरचं नाव आहे “ऑपरेटिंग सिस्टिम” !

तो जर फ्लॉपी डिस्कवर असेल, तर त्यालाच “डिस्क ऑपरेटिंग सिस्टिम” किंवा “डॉस” असं म्हणतात.

व्याख्या

ऑपेरटिंग सिस्टिम म्हणजे संगणकाच्या एकंदर कार्यात शिस्त आणून ते सुनियंत्रित करणाऱ्या विविध प्रकारच्या प्रोग्रॅम्सचे संकलन ! हे सर्व प्रोग्रॅम्स एकाच फ्लॉपी डिस्कवर राहू शकतात.

ऑपरेटिंग सिस्टिम ची आवश्यकता

साधारण १९६० साल पर्यंत संगणकाचे काम नियंत्रित करण्यासाठी एक खास मनुष्य लागे, त्याला ऑपेरटर म्हणत. त्याला पुष्कळ गोष्टी हातानेच कराव्या लागत.

त्या काळात संगणकावर एका वेळी एकच प्रोग्रॅम अमलात आणता येत असे.

तो संपला, की पुन्हा संगणकाची मेमरी साफ करून त्याला मूळ पदावर आणले जाई. त्यासाठी ऑपेरटरला निरनिराळी बटणे दाबावी लागत.

ही क्रिया संपली की ऑपरेटर संगणकात दुसरा प्रोग्रॅम भरीत असे.

मधल्या काळात संगणकाचा अमूल्या वेळ मातीमोल होत असे. पूर्वी संगणकात भरावयाचा प्रोग्रॅम म्हणजे शेकडो, हजारो करायची चळत असायची.

संगणकाच्या इन्पुट साधनात ही सर्व चळत हातानेच भरावी लागे. त्यानंतर ऑपरेटर पुन्हा अनेक बटणांची उघडझाप करून संगणक चालू करी. त्या मधून जे निष्कर्ष बाहेर पडत तेही हातानेच गोळा करावे लागत.

या सगळ्या भानगडीत किती वेळ फुकट जात असेल याचा विचार केलेला बरा !

आता या सर्व गोष्टी करण्यासाठी ऑपरेटर नावाच्या माणसाची गरज लागत नाही. संगणकाचा सर्व कारभार आता ऑपरेटिंग सिस्टिमकडे सोपविण्यात आला आहे.

तिच्यामुळेच एक प्रोग्रॅम संपला की संगणक आपोआप दुसरा प्रोग्रॅम हातात घेतो.

एवढंच नाही तर काही संगणकात एकाच वेळी अनेक प्रोग्रॅम हाताळता येतात.

ऑपरेटिंग सिस्टिममुळे संगणक स्वतःच्या कार्यावर स्वतः देखरेख ठेवू शकतो. आपल्याला पाहिजेत ते प्रोग्रॅम्स, मुख्य प्रोग्रॅमच्या अंमलबजावणीसाठी आपोआप उपयोगात आणतो.

दिलेल्या डाटावर योग्य प्रक्रिया करून वापरणाच्याला पाहिजेत तसे निष्कर्ष छापून देतो.

एकदा संगणक चालू करून त्यात प्रोग्रॅम आणि डाटा भरला की पुन्हा संगणकाकडे पहावं लागत नाही.

संगणकाला कमीतकमी वेळ रिकामे ठेवून त्याच्याकडून अतिशय कार्यक्षमतेने, आणि कमीतकमी खर्चात काम करून घेणं हेच ऑपरेटिंग सिस्टिमचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. असं म्हणायला हरकत नाही.

ऑपरेटिंग सिस्टम चे कार्य / ऑपरेशन्स आणि फायदे

  • अनेक प्रोग्रॅम्सचे कुशलतेने संचालन
  • संगणकाच्या साधनसंपत्तीचे व्यवस्थापन
  • संगणकाच्या मेमरीचे सुयोग्य व्यवस्थापन
  • इनपुट, आउटपुट साधनांचे नियंत्रण
  • प्रोग्रॅममधील चुकांची दखल घेऊन त्या संगणक वापरणाऱ्याच्या निदर्शनास आणून देण्याची व्यवस्था

असे ऑपरेटिंग सिस्टिमच्या कामाचे प्रामुख्याने पाच विभाग आहेत. या प्रत्येकाचा थोडक्यात विचार करायला हरकत नाही.

अनेक प्रोग्रॅम्सचे कुशलतेने संचालन

मोठ्या संगणकांना एकाचवेळी अनेक प्रोग्रॅम हाताळावे लागतात. त्यांचा क्रम काय असावा, हा एक प्रमुख प्रश्न असतो. ऑपरेटिंग सिस्टिम अनेक गोष्टी विचारात घेऊन हा क्रम निश्चित करते.

त्यामध्ये कोणत्या प्रोग्रॅमची अंमलबजावणी चालू आहे, कोणती साधने वापरली जात आहेत, नवीन प्रोग्रॅमसाठी कोणती साधने ताबडतोब लागतील.

कोणत्या प्रोग्रॅमना अग्रक्रम द्यायचा आणि एखाद्या प्रोग्रॅमसाठी काही खास प्रक्रिया करायची आहे काय ? वगैरे अनेक गोष्टी ऑपरेटिंग सिस्टिम ठरविते.

या पैकी ऑपरेटिंग सिस्टिममधील ‘स्पूलर’ नावाचा विशिष्ट प्रोग्रॅम संगणकाकडे येणाऱ्या प्रोग्रॅमचा क्रम निश्चित करतो.

संगणकाच्या साधनसंपत्तीचे आणि संगणकाच्या मेमरीचे सुयोग्य व्यवस्थापन

एखाद्या विशिष्ट साधनाचा उपयोग चालू प्रोग्रॅमला करू द्यायचा की नाही, याचाही निर्णय ऑपरेटिंग सिस्टिमला घ्यावा लागतो. एखाद्या प्रोग्रॅमला जे साधन हवे असते ते तात्काळ त्याला मिळाले, की त्याची प्रक्रिया लगेच चालू होते.

काही वेळा साधन उपलब्ध नसल्यामुळे प्रोग्रॅमची अंमलबजावणी लांबते. तर प्रोग्रॅमच्या क्रमामध्ये एखाद्या प्रोग्रॅमला विशिष्ट साधनासाठी खोळंबून रहावे लागते.

अशा वेळी ज्या प्रोग्रॅमची अंमलबजावणी चालू आहे, अशा प्रोग्रॅमचा क्रम ऑपरेटिंग सिस्टिम बदलून टाकते.

इनपुट, आउटपुट साधनांचे नियंत्रण

इनपुट, आउटपुट साधनांचा कार्यक्षमतेने उपयोग करून घेण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टिममध्ये काही विशिष्ट्य सूचनांचा समूह असतो.

त्याला ‘इनपुट आउटपुट कंट्रोल सिस्टिम’ असं नाव आहे. त्याला ‘इनपुट आउटपुट नियंत्रक संहिता’ असं नाव देता येईल.

विशिष्ट प्रोग्रॅमला, विशिष्ट वेळी कोणते इन्पुट आउटपुट साधन लागेल याचा विचार करून ते त्याला वेळच्या वेळी उपलब्ध करून देणे, हे या संहितेचे काम आहे.

खरं म्हणजे ‘मला अमुक प्रकारचे इनपुट किंवा आउटपुट साधन पाहिजे’ अशी सूचना, प्रोग्रॅमकडून प्रथम ऑपरेटिंग सिस्टिमला मिळते आणि हे काम ती इनपुट आउटपुट नियंत्रक संहितेकडे सोपवून देते.

प्रोग्रॅममधील चुकांची दखल घेऊन त्या संगणक वापरणाऱ्याच्या निदर्शनास आणून देण्याची व्यवस्था

प्रोग्रॅम लिहिताना स्वाभाविकपणेच त्यात चुका होतात. मोठमोठ्या प्रोग्रॅममध्ये त्या अटळपणे होतातच, प्रोग्रॅममधील चुका ऑपरेटिंग सिस्टिमच्या तात्काळ लक्षात येतात.

ती ताबडतोब त्या प्रोग्रॅमची कार्यवाही थांबविते आणि संगणक वापरणाऱ्या व्यक्तीला त्या प्रमाणे सूचना देते.

वापरणारा ती चूक दुरूस्त करेपर्यंत ऑपरेटिंग सिस्टिम दुसऱ्या प्रोग्रॅमची कार्यवाही चालू करते.

ऑपरेटिंग सिस्टम चे काम

संगणक चालू करतानाच ऑपरेटिंग सिस्टिमचे सर्व प्रोग्रॅम्स प्रथम संगणकाच्या मुख्य मेमरीत संग्रहित करावे लागतात. अर्थातच मुख्य मेमरीमधील बरीचशी जागा ऑपरेटिंग सिस्टिमच अडवून टाकते.

ऑपरेटिंग सिस्टिमने किती जागा व्यापली आहे व किती प्रोग्रॅमच्या कार्यवाहीसाठी उपलब्ध आहे, हे आपल्याला सहजपणे समजू शकते.

प्रत्येक प्रोग्रॅमसाठी मुख्य मेमरी मधील विशिष्ट जागा लागते.

एकाच वेळी अनेक प्रोग्रॅम्सची कार्यवाही चालू असेल, तर सर्व प्रोग्रॅम्सना मुख्य मेमरीमध्ये जागा उपलब्ध होऊ शकत नाही.

ज्यांना जागा मिळत नाही, त्यांच्या कार्यवाहीला विलंब होतो.

त्यामुळेच ज्या प्रोग्रॅम्सना मेमरीमध्ये जास्त जागा लागते, असे प्रोग्रॅम ऑपरेटिंग सिस्टिम कामाची गर्दी नसेल, अशाच वेळी अंमलात आणते.

संगणकामध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या खालोखाल ऑपरेटिंग सिस्टिम हाच महत्त्वाचा घटक आहे. तिच्या मुळेच संगणक अत्यंत सुलभतेने वापरता येतो.

हे सुद्धा वाचा