पास्कल प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय | PASCAL PROGRAMMING LANGUAGE IN MARATHI

पास्कल प्रोग्रॅमिंग लँग्वेज | PASCAL PROGRAMMING LANGUAGE IN MARATHI

पास्कल प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय | PASCAL PROGRAMMING LANGUAGE IN MARATHI – गेल्या काही वर्षात उच्च पातळीच्या अनेक भाषा निर्माण झाल्या आणि त्यात नव नवीन भाषांची भर पडतेच आहे. पूर्वी भाषेच्या बांधेसूदपणाकडे फारसं लक्ष देण्यात आलं नाही.

त्यामुळेच फोट्रॉन, बेसिक, कोबोल वगैरे भाषा थोड्याशा अघळपघळ निपजल्या. सध्या भाषेच्या बांधेसूदपणाकडे कटाक्षाने लक्ष दिलं जातं.

मूळ बेसिक, फोट्रॉन या भाषेतही जास्तीतजास्त सूत्रबद्ध प्रोग्रॅम लिहिण्यावर सध्या भर दिला जातो. म्हणूनच या पद्धतीला ‘स्ट्रक्चर्ड प्रोग्रॅमिंग’ या नावाने संबोधण्यात येतं.

समजा, मुळात भाषाच संस्कृतसारखी सूत्रबद्ध असेल, तर अशा भाषेत मुद्देसूद प्रोग्रॅम लिहणं फार सोपं असतं. पास्कल या भाषेचं, सूत्रबद्धता हेच एक खास वैशिष्ट्य आहे.

सूत्रबद्ध प्रोग्रॅम हा नेहमीच सुस्पष्ट, कार्यक्षम आणि बिनचूक होतो.

पास्कल प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा शोध

१९७० च्या सुमाराला स्वित्झर्लंड देशातील झूरिच या शहरात प्राध्यापकाचा व्यवसाय करणाऱ्या, निकलाउस विर्थ यांनी प्रथम पास्कल या भाषेचा ओनामा केला.

विद्यार्थ्यांना मुद्देसूद पद्धतीने प्रोग्रॅम लिहिण्याची सवय व्हावी, हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. आपल्या या नव्या भाषेला त्यांनी ब्लैझ पास्कल या १७ व्या शतकातील फ्रेंच गणितज्ज्ञाचे नाव मुक्रर केले.

१६४२ साली पास्कल प्रथमतः आकडेमोड करणारे एक यंत्र सिद्ध केले होते. त्यावेळी तो फक्त १९ वर्षाचा होता. त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेला मानाचा मुजरा, म्हणजेच सध्याची त्याच्या नावावर ओळखली जाणारी पास्कल ही संगणकाची भाषा !

पास्कलची वैशिष्ट्ये

एक मोठ्या पास्कल प्रोग्रॅममध्ये अनेक छोटे छोटे उपप्रोग्रॅम असतात. मुख्य प्रोग्रॅम प्रमाणेच हे सर्व प्रोग्रॅमही अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने लिहिले जातात. प्रोग्रॅममधील सर्व चल संख्यांचे प्रकार सुरूवातीलाच घोषित करण्यात येतात.

त्यामुळे प्रोग्रॅममधील दशांश अपूर्णांक, पूर्णांक, स्थिर संख्या, वगैरे गोष्टींची आधीच माहिती मिळते. तसेच निरनिराळ्या प्रकारचा डाटा पास्कलमध्ये सुलभतेने हाताळता येतो.

प्रोग्रॅममधील नियंत्रण बदलण्याच्या अनेक पद्धतीचाही पास्कलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पास्कलचे प्रकार

पास्कल ही भाषा व्यापारी कामासाठी लिहिल्या जाणाऱ्या प्रोग्रॅमसाठी उपयोगाची नाही. शास्त्रीय किंवा गणिती प्रोग्रॅमसाठी मात्र तिचा चांगलाच फायदा होतो.

१९८३ साली ही भाषा प्रमाणित करण्यात आली. सध्या ‘टर्बो पास्कल’ हा या भाषेचा प्रकार बराच लोकप्रिय आहे.

हे सुद्धा वाचा