डाटा / डेटा म्हणजे काय | WHAT IS DATA IN MARATHI

डाटा / डेटा म्हणजे काय | WHAT IS DATA IN MARATHI

डाटा / डेटा म्हणजे काय ? डाटा / डेटा म्हणजे असंघटित माहिती ! मुंबईच्या महालक्ष्मीसमोर ठेवलेल्या पेटीत कुणी पाच, कुणी दहा तर कुणी पन्नास पैसे टाकतात. एक रुपया पासून शंभर रुपयापर्यंत पैसे टाकणारेही महाभाग काही कमी नसतात.

मंदिर बंद होण्याच्या सुमाराला विविध प्रकारच्या नाण्यांची आणि नोटांची एकच गर्दी त्या पेटीत उडालेली असते. हा झाला असंघटित माहितीचा प्रकार.

रात्रीच्यावेळी पुजारी लोक बसून प्रत्येक प्रकारची नाणी वेगळी करतात. प्रत्येक प्रकारामध्ये किती नाणी आणि नोटा आहेत त्याची मोजदाद होते.

त्यांना अलग अलग पिशव्यात बंदिस्त करून एकंदर मिळकतीचा हिशोब लावला जातो, ही झाली सूत्रबद्ध माहिती.

खरं म्हणजे दैनंदिन व्यवहारातीलच नव्हे, तर साऱ्या विश्वातील कोणतीही वस्तुस्थिती संगणकाचा डाटा होऊ शकते.

एखाद्या मोठ्या कारखान्यातील सर्व कामगारांची इत्थंभूत माहिती, विमानांच्या उड्डाणांचे किंवा रेल्वेच्या सुटण्याचे वेळापत्रक, कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणाची माहिती, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे मार्क, जमाखर्चाच्या मोठमोठ्या रकमा, या आणि अशा सहस्त्रावधी प्रकारच्या गोष्टी म्हणजे संगणकाचा डाटा किंवा संगणकाला पुरविण्यात येणारी असंघटित माहिती !

आपण ज्या स्वरूपात संगणकाला डाटा पुरवितो त्याच स्वरूपात तो आपल्याला मिळावा अशी आपली इच्छा नसते. तर त्यात काही सुसूत्रता यावी आणि पाहिजे असलेले निष्कर्ष आपल्याला ताबडतोब मिळावेत असं आपल्याला वाटतं.

म्हणजेच अगदी विस्कळीत स्वरूपात असलेली माहिती आपण संगणकाला पुरवितो आणि त्याच्या कडून सुसूत्र माहितीची अपेक्षा करतो.

उदाहरणार्थ

उदाहरणार्थ, संगणकाला विद्यार्थ्यांचे क्रमांक आणि त्यांना विविध विषयात मिळालेले मार्क दिले, की आपल्याला कोणत्या माहितीची अपेक्षा असते पहा.

एकंदर पास झालेले विद्यार्थी, पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या वर्गात प्रत्येकी किती आहेत, डिस्टिंक्शन किती जणांना मिळाले, प्रत्येक विषयात सर्वात जास्त मार्क कुणाला मिळाले, एकंदरीत निकाल किती टक्के लागला वगैरे वगैरे.

संगणकाने या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी आपली अपेक्षा असते, आणि ती अल्पावधीत संगणक आपल्याला देऊ शकतो.

इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग

संगणकाला दिलेल्या कच्च्या डाटावर योग्य प्रक्रिया करून तिचे सुसूत्र माहितीत रूपांतर करणं, यालाच इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंग असं नाव आहे. मोठ मोठ्या उद्योगात आणि कंपन्यांमधून हटकून तशी सोय असते.

ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये एकदा पेशंट दाखल झाला, की तो कोणत्या खोलीत आहे, त्याच्यावर कोणत्या डॉक्टरांचे उपचार चालू आहेत, निरनिराळ्या विभागातून त्या रोग्यावर दररोज किती खर्च झाला, याची इत्थंभूत माहिती रोजच्या रोज एकाच ठिकाणी गोळा करता येते आणि रोगी ज्या दिवशी हॉस्पिटल सोडून निघेल, त्याच दिवशी त्याला सर्व खर्चाचे बिल देण्यात येते.

एवढंच नव्हे तर आर्थिक वर्षाच्या अखेरीला, सबंध हॉस्पिटलचा जमाखर्च काही तासात करता येतो. इलेक्ट्रॉनिक डाटा प्रोसेसिंगचीच ही किमया आहे.

प्रश्न

  • १ जीबी डाटा म्हणजे किती एमबी?
  • १ जीबी डाटा म्हणजे १०२४ एमबी

हे सुद्धा वाचा –